वाडी रत्नागिरी चा मंडळ अधिकारी मनोज दाभाडे लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी
वाडी रत्नागिरी ता.पन्हाळा येथील मंडळ अधिकारी मनोज कौतिक दाभाडे (वय-३३), (रा. सरकारी निवासस्थान, विचारे माळ, कोल्हापूर )आज शेतजमनीच्या ऑनलाईन उताऱ्यावर दुरुस्तीसाठी दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातच झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांची पोहाळे तर्फ आळते येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदाराने या शेतजमिनीचा ऑंनलाईन सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मंडळ अधिकारी दाभाडे यांच्या कडे दिली होती. याबाबत आठ ते दहा दिवस झाले तरी काम झाले नसल्यामुळे तक्रारदाराने दाभाडे याच्याकडे पाठपुरावा केला. यासाठी तक्रारदार हे सर्कल दाभाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु दाभाडे हा फोन उचलत नसल्यामुळे तक्रारदाराने भावाच्या फोनवरुन मंडल अधिकारी दाभाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी दाभाडेने तक्रारदाराच्या शेत जमिनीचा सातबारा दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. आणि ही रक्कम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात भेटण्यास सांगितले.
यानुसार तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचून मंडळ अधिकारी मनोज दाभाडे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याचा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक शरद पोरे, रुपेश माने, छाया पाटोळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!