मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, दि. 16 :- लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होत असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे तथापि मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
भारत निवडणुक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनाचालक परवाना, केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय व्दारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र आणि खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC)आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी www.nvsp.in ला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) किंवा वरील 11 ओळखपत्रापैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *