ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

आनंदाचा वारसा पुढे नेणारी अनोखी मैफल ‘आनंदयात्री’

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मनस्वी कलाकार अर्थातच पु. ल. देशपांडे. आपल्या साहित्याने पु. ल. यांनी
महाराष्ट्राला समृद्ध केलंय. पुलंच्या प्रतिभेने पुलकित झालेला अनोखा सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १७ मार्चला स्टार
प्रवाहवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?
जगण्याच्या क्षणाक्षणांत आनंद कोण भरते?
कोण लिहिते कविता आणि कोण रचते गीत?
कुणाच्या सुरांशी आपली जुळून जाते प्रीत?
कोण आणते हसू ओठी, आनंदाश्रू नेत्री?
ते सारे जे आम्हा लाभले दिग्गज आनंदयात्री
लेखक, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या पुलंनी आपल्या विविध कलांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही पु. ल. नावाची जादू प्रेक्षकांना भुरळ घालते. पु.ल.यांच्या याच समृद्ध कलेचा ठेवा ‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत ‘आनंदयात्री’ कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडण्यात येणार आहे. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल १७ मार्चला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या खास कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी, जयदीप वैद्य, नचिकेत लेले, सावनी दातार कुलकर्णी, चंद्रकांत काळे, मधुरा दातार आणि मुग्धा वैशंपायन या सुप्रसिद्ध गायकांनी पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी सादर करत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकलं. तर अभिनेते संजय मोने, आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री यांनी पु. लं.च्या साहित्यातील अजरामर पात्रं पुन्हा एकदा रंगमंचावर जिवंत केली. पु. ल. यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वायदा केला’ या गाण्यावर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनिसने ठेका धरत आनंदयात्रीची मैफल संस्मरणीय केली. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन केलंय मृणाल कुलकर्णी यांनी. या अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पु. लं.च्या आठवणींना उजाळा दिला आहे. या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आनंदयात्री हा फक्त कार्यक्रम नसून ती एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा ‘स्टार प्रवाह’चा प्रयत्न आहे. आनंदयात्रीच्या या प्रवासात अनेक दिग्गजांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्ताने मानवंदना देण्यातयेईल. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल याची आम्हाला खात्री
आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *