ह्युमन राईट मिरर
Sunday, 24 Mar 2019

‘धुमस’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

ऍक्शन, रोमान्स, आणि रोमँटिक गाणी असलेल्या बहुचर्चित ‘धुमस’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे जलसंधारण मंत्री मा. राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, माजी आमदार आनंदकुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, जीवन जानकर, संतोष पाटील यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे ‘धुमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. रोमान्स आणि ऍक्शन चे मिश्रण असलेल्या ‘धुमस’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रिअल लाईफ मध्ये नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपाने सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. तसेच गोपीचंद पडळकर – साक्षी चौधरी आणि रोहन पाटील – कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटीक  केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते. याशिवाय विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘धुमस’ मध्ये आहेत. त्यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, “आपले नेतृत्व कुठेही कमी पडत नाही याची जाणीव समर्थकांना झाल्याशिवाय नेतृत्व उभं राहू शकत नाही. समाजाची भावना मांडणारा व उपेक्षित घटकांना न्याय देऊ पाहणारा ‘धुमस’ हा एक वेगळा सिनेमा आहे”. उत्तमराव जानकर म्हणाले, “राज्यभर फिरत असताना समाजाची अवस्था मी जवळून बघितली. ती मांडण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हे माध्यम योग्य आहे असे आम्हाला वाटले. ‘धुमस’ ही काळजातून आलेली कलाकृती आहे.” गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात ६- ७ चित्रपट बघितले. वीस वर्षापूर्वी मी थिएटर मध्ये गेलेलो, मात्र आपली भूमिका समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी चित्रपट काढावा, कारण हे एक प्रभावी मध्यम आहे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे ‘धुमस’ चित्रपट बनवण्याचा आमचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे. डी. गोवर्धन आणि अविनाश काले यांच्यामुळेच हा चित्रपट निर्माण झाला. माजी आमदार आनंदकुमार पाटील यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे उत्पन्न शहीद जवानांच्या कुटुंबियांना द्यावे अशी सूचना केली, निर्मात्यांनी ती तत्काळ मान्य देखील केली. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ या चित्रपटाचे निर्माते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर असून डी. गोवर्धन सहनिर्माते आहेत. चित्रपटासाठी गीतलेखन अविनाश काले यांनी केले असून पी. शंकरम यांचे संगीत लाभले आहे. या गीतांना सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांचा स्वरसाज लाभला आहे. फूल्ल ऍक्शनपॅक्ड असलेल्या या चित्रपटाची तांत्रिक बाजू दक्षिणेतील नामांकित तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवत सामान्य माणसाच्या समस्या मांडणारा ‘धुमस’ हा चित्रपट २९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *