निवडणूकीत आपली ताकद दाखवायची असेल तर जनतेनेच त्यांचा कडेलोट केला पाहिजे – आम सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी :
विदर्भाला एक न्याय आणि उर्वरित महाराष्ट्राला एक न्याय असा दुजाभाव करणाऱ्या सत्ताधारी सरकारच्या विरोधात जनतेतून सूर उमटायला लागला आहे. त्यामुळे या सरकारचा कडेलोट करण्याची ताकद जनतेत आहे. 2019 च्या निवडणूकीत आपली ताकद दाखवायची असेल तर जनतेनेच त्यांचा कडेलोट केला पाहिजे. अशी जोरदार टीका आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर केली.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर त्यांनी आज आपले पदगृहण करुन मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला. या कार्यलय प्रवेशावेळी आमदार सतेज पाटील काँग्रेस कमिटीत येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करत स्टेजवर नेले. यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार सतेज पाटील यांचा पदगृहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार सतेज पाटील यांनी एका विशिष्ट वेळी पक्षाची धुरा माझ्या हाती पडली. गेल्या चौदा वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी आजरा, चंदग आणि गडहिंग्लज या तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठ बांधली. अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला बळ देणे आणि पुढे नेण्याचे काम करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान 40 टक्के काँग्रेसचे सदस्य असले पाहिजेत त्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या
लाखो लोक काँग्रेसच्या मागे आहेत. आजही विरोधी पक्ष म्हणून सक्षम पक्ष आहे. भाजप सरकार हे खोटं सरकार आहे या सरकारच्या विरोधात आंदोलन करायला अनेक विषय आहेत. आता एमपीएससी करणाऱ्यांना या सरकारच्या काळात भीकमागो आंदोलन करावे लागते. ही दुर्दैवी बाब आहे. हे सरकार विदर्भाला वीजदर वेगळा आणि पश्चिम महाराष्ट्रात वीजदर वेगळा असा दुजाभाव केला आहे. या सरकारने राज्याला एकच न्याय द्यायला पाहिजे. मात्र तसं केलं नाही.
आता जनतेतून या सरकारच्या विरोधात सूर उमटायला लागला आहे. त्यामुळे जनतेने 02019 च्या निवडणूकीत आपली ताकद दाखवली पाहिजे. या सरकारचा कडेलोट करण्याची ताकद जनतेत असल्याची टीका भाजप सरकारवर करत आगामी निवडणुकीत जनतेनेच त्यांचा कडेलोट करावा. असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
वर्ग दोनचे किल्ले असलेल्या ठिकाणी सरकार हॉटेल काढत आहे. मात्र या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपवण्याचा कट या भाजप सरकारचा आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून आमचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम हे सरकार करत आहेत. आता कोणी घाबरू नये मोजकेच मावळे असले तरी गड जिंकल्याशिवाय राहायचे नाही असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी गुलाबराव घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देतांना आमदार पाटील यांनी 20 वर्षे काँग्रेसचे धुरा सांभाळली आहे. सध्या पक्ष अडचणीत असतांना त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारून समोर मोठे आव्हान असतांना पक्षाची धुरा हाती घेतली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकट करावे अशी अपेक्षा गुलाबराव घोरपडे यांनी व्यक्त केली. तर शशांक बावसकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अडचणीच्या काळात आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. इचलकरंजीतून खऱ्या अर्थाने काँग्रेसला धक्का बसला. तरीही इचलकरंजी मध्ये काँग्रेसचे काम हे चालणारच त्यामुळे इचलकरंजीतून काँग्रेसचा आमदारच निवडून येणार. कार्यकर्ता हा भक्कम आहे त्यामुळे येत्या निवडणूकीत आपण ताकदीने उतरू आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार बावसकर यांनी केला.
तर हिंदुराव चौगुले यांनी सध्या वैचारिक गोंधळ झाला असतांना आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस पक्षाने धुरा सोपवली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीमुळे नक्कीच काँग्रेस पक्ष बळकट होईल. या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आमदार सतेज पाटील हे उभारी देतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरलाताई पाटील यांनी सत्वपरीक्षेच्या वेळी आमदार सतेज पाटील यांच्याकडे पक्षाचा धुरा आली. कार्यकर्ता पक्षापासून दूर गेलेला नाही. महिला या काँग्रेससोबतच आहेत त्यामुळे आम्हाला बळकटी द्या काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था आणू अशी ग्वाही सरलाताई पाटील यांनी दिली. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. उपमहापौर भूपाल शेटे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, युवानेते ऋतुराज पाटील, माजी आमदार संजीवनी गायकवाड, दौलत देसाई, सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, जयराम पाटील, राजूबाबा आवळे यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!