शिवशाही बसच्या तिकीट दरात भरघोस कपात:परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकूलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दरकपात करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी घोषीत केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे. एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे, त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एस.टीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा  वापर करावा , असे आवाहन एसटी महामंडळातर्फे  करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *