शिवसेनेने कधीही जातीयवाद केला नाही : परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते

कोल्हापूर /प्रतिनिधी
 शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्रित करून जातीय तेड नष्ट करण्याचा पायंडा पाडला. अनुसूचित जातीतील अनेक युवक, महिला शिवसेनेत येवून यशास गवसणी घालत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कोणताही जातीय मतभेद केला नाही आणि शिवसैनिकांना करू दिला नाही. त्यामुळे शिवसेना अनुसूचित जाती जमातीमधील बांधवांच्या पाठीशी ठाम उभी असून, आपणची शिवसेनेच्या पाठीशी ठाम रहावे, असे आवाहन परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध अनुसूचित जाती जमातींनी आमदार राजेश क्षीरसागर यांना जाहीर पाठींबा दिला. टिंबर मार्केट येथील शिंदे लॉन येथे हा मेळावा पार पडला.  
            यावेळी परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांनी, अनुसूचित जाती जमातींचा मेळावा शिवसेनेने घेतला म्हणून विरोधकांना पोटशूळ निर्माण झाले असेल. शिवसेनेची स्थापना मुळातच जातीयवाद गाडून मराठी माणसाच्या उन्नतीसाठी झाली आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जातीयवाद केला नाही कि शिवसैनिकांना करू दिला नाही. सर्वच समाजातील बांधव शिवसेनेत काम करत असून, शिवशक्ती – भीमशक्तीची एकजूट प्रगत महाराष्ट्र घडवेल, अशी धारणा शिवसेनाप्रमुखांची होती. शिवसेनेच्या या धोरणात आजची बदल झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनीही अनुसूचित जाती जमातीमधील कार्यतत्पर नेतृत्वाना संधी दिली आहे. त्यामुळे निश्चित होवून शिवसेनेच्या कुटुंबात सामील व्हा, शिवसेनेत मिळणारा मानसन्मान इतर कोणत्याही पक्षात मिळणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना जात – पात मानणारी संघटना नाही त्यामुळे कट्टर शिवसैनिक म्हणून आपणही कधी जातीय मतभेद केले नाहीत. आलेल्या प्रत्तेक माणसांचे काम करायचे हीच कार्यपद्धती गेली १० वर्षे जोपासली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास विद्युत रोषणाई, लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या स्मारकास निधी, अनुसूचित जाती जमातीमधील मंडळाचे सामाजिक सभागृह व्यायाम साहित्य बौद्ध विहारसाठी रु.१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. संघर्ष, सामाजिक, सांस्कृतिक माध्यमातून कामांचा डोंगर उभा केला असून, विरोधकांना प्रचारासाठी कोणतेच मुद्दे नसल्याने आपल्या विरोधात गैरसमज निर्माण केले जात आहेत. शिवसेना शहर कार्यकारणी मध्ये अनेक पदाधिकारी शिवसैनिक अनुसूचित जाती जमातीचे आहेत त्यांच्याशी बंधुत्वाच नात असून मी तुमचाच आहे, कोणतीही समस्या असेल तर हाक द्या, असे आवाहन करत अनुसूचित जाती जमातींच्या प्रश्नाबाबत शासनाला जाब विचारू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
            यानंतर बोलताना शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, विविध समाजाची वज्रमुठ बांधून कोल्हापूरचा विकास साधायचे ध्येय शिवसेनेने अंगिकारले आहे. परंतु अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांमध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाने जातीय विष पेरले. ५० वर्षाच्या काळात समाज बांधवांना दिन दुबळे केले. परंतु या उलट युतीने विविध योजना राबवून अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील बंगल्याचे भाडेही कॉंग्रेस – राष्ट्रवादीने भरले नव्हते पण शिवसेना भाजप युतीने तो बंगला ताब्यात घेतला हि गोष्ट अभिमानाची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शिका आणि संघटीत व्हा हा विचार अवलंबायचा असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनाच याला पर्याय आहे.
            यानंतर बोलताना रुपाली कवाळे यांनी, मातंग समाजाची असून गेली ६ वर्षे शिवसेनेत काम करताना कोणताही भेदभाव झालेला नाही म्हणूनच शिवसेनेच्या महिला आघाडीची पदाधिकारी असल्याचा गर्व आहे. गेल्या सहा वर्षात समाजातील अनेक लोकांची कामे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्फत मार्गी लावली आहेत. पापाची तिकटी येथील भीषण अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या समाज बांधवांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मदत केली. हे फक्त शिवसेनेत घडू शकते. आमदार राजेश क्षीरसागर हे आपले हक्काचे आमदार असून, त्यांना विजयी करण्यासाठी अनुसूचित जाती जमातीतील सुजाण नागरिकांनी पाठीशी रहावे, असे आवाहन केले.
            यावेळी बहुजन संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ साठे यांनी, ३ जानेवारीला घडवलेला दंगा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी कधीच करणार नाही. काही समाजकंटकांनी जातीय टेड निर्माण करण्यासाठी हा दंगा घडविला. परंतु आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेने सर्व परिस्थिती आटोक्यात आली. आमदार जातीयवादी असते तर त्यांनी बौद्ध विहार आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी दिला नसता. मानवता हाच धर्म आमदार राजेश क्षीरसागर यांनी मानला असून, धर्मनिरपेक्ष कार्यतत्पर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आणू, अशा ठाम विश्वास व्यक्त केला.
            यावेळी *खाटिक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे, ख्रिस्त्री युवा शक्तीचे अध्यक्ष राकेश सावंत, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले.
            यावेळी महेश उत्तुरे, अदाम देवकुळे, रवी देवकुळे, मारुती चौगुले, शिवाजी पटवणे, यल्लापा कोडलीकर, श्रीपती चीगदुळ, जगदीश गळवे, बापू कदम, राजू ढाले, जयसिंग वायदंडे, विराग बुचडे, विलास बोंगाळे*आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!