ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

‘शेड्युल्ड कास्ट इलाइट्स’ शोधग्रंथाचे शुक्रवारी कोल्हापुरात प्रकाशन

कोल्हापूर, दि. १३ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांच्या ‘शेड्युल्ड कास्ट इलाइट्स’ या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ येत्या शुक्रवारी (दि. १५ मार्च) सायंकाळी ५.३० वाजता येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फुले-शाहू- आंबेडकर फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी आज येथे दिली.
डॉ. भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह भारतीय समाजशास्त्र सोसायटीच्या (नवी दिल्ली) अध्यक्ष प्रा. आर. इंदिरा आणि बेंगलोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक प्रा. आर.एस. देशपांडे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा. उत्तमराव भोईटे असतील. या कार्यक्रमास दिंडीगुल (तमिळनाडू) येथील गांधीग्राम विद्यापीठाचे प्रा. एस. गुरूसामी, लखनौ (उत्तर प्रदेश) येथील श्री जेएनपीजी महाविद्यालयाचे प्रा. मनोजकुमार टिओटिया, नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अभ्यास केंद्राचे प्रा. राजेश खरात आणि नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. विकास जांबुळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या महत्त्वपूर्ण शोधग्रंथाच्या प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. भालेराव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *