महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा कोथरूड मधून अर्ज दाखल

पुणे /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, खा. गिरीश बापट, खा. संजय काकडे, आ. मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शशिकांत सुतार, कोथरूडमधील शिवसेनेचे माजी आ. चंद्रकांत मोकाटे आणि पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. भाजपा शिवसेना महायुतीचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल बुधवारी मोतीबाग येथे भेट दिली. सायंकाळी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. विविध संस्था संघटना व व्यक्तींनी जाहीरपणे मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेले विकासपर्व अधिक बळकट करण्यासाठी मा. चंद्रकांतदादा पाटील यांना आमदार म्हणून विक्रमी मताधिक्यााने कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत पाठवण्यात येईल, असा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
मा. चंद्रकांतदादा पाटील हे विधान परिषदेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ विविध स्तरांवर समाजकार्य केले आहे.
गेल्या काही दिवसात त्यांनी भाजपा संपर्क मोहीम अभियानांतर्गत समाजातील विविध क्षेत्रांमधील प्रख्यात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्या सर्वांकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!