पोलीस उद्यानामध्ये लहान मुलांसाठी लोकसहभागातून ट्राफिक स्कूल विकसित करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: कोल्हापूरातील पोलीस उद्यानामध्ये लहान मुलांना वाहतुक नियमांची माहिती व्हावी, यासाठी लोकसहभागातून अद्ययावत ट्राफिक स्कूल विकसित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाच्यावतीने ताराबाई पार्क येथे विकसित केलेल्या आकार उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, नगरसेवक सत्यजित कदम, सुनिल कदम, रत्नेश शिरोळकर, विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, संदिप देसाई, केएसबीपीचे सुजय पित्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणावर अधिक भर देण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरात गार्डन विकसित करणे, चौकांचे सुशोभिकरण, रस्ते दुभाजकांमध्ये फुलझाडे अशा विविध शहर सौंदर्यीकरणाच्या गोष्टी विकसित केल्या आहेत. यापुढील काळातही शहराच्या प्रत्येक भागात/कॉलनीत बागा, मंदीरे अशा विविध गोष्टी विकसित करण्यासाठी सर्वती मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पोलीस गार्डन हे एक नागरिकांचे विशेषत: पर्यटकांचे आकर्षण ठरत असून या गार्डनमध्ये लवकरच लोकसहभागातून ट्राफीक स्कूल संकल्पना राबविली जाईल, जेणे करुन मुलांना लहान वयातच वाहतूक नियमाची आणि वाहतूक शिस्तीची सवय लागेल, असेही ते म्हणाले.
शहराच्या सौंदर्यीकरणाव्दारे स्थानिक नागरिकांना आनंद मिळावा, तसेच पर्यटक आकर्षित व्हावेत, यावर अधिक भर दिला असून या उपक्रमाव्दारे शहराची श्रीमंती वाढविण्याचेच काम होत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात लोकांना आनंद देणारे नवनवे प्रकल्प हाती घेतले असून पर्यटनाला विशेष चालना दिली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई (श्री महालक्ष्मी) मंदीर विकासासाठी 89 कोटीचा निधी मंजूर करुन आणला असून पहिल्या टप्यात दर्शन मंडपाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी कोल्हापूर रस्ते सौदयीकरण प्रकल्पाचे सुजय पित्रे यांनी आकार उद्यान हे भूमीती या संकल्पनेवर आधारित विकसित केले असून भविष्यातही हे उद्यान अतिशय नेटके आणि सुंदर राहील असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी नगरसेवक सत्यजित कदम यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात आकार उद्यानाबाबत माहिती दिली तसेच या परिसरातील नागरिकांच्या अडचणी विषद केल्या.
समारंभास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, नगरसेविका अर्चना पागर, उमा इंगळे, सीमा कदम, कविता माने, स्मिता माने, नगरसेवक शेखर कुसाळे तसेच पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे जिल्हा समन्वयक विजय जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक -नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!