पोलंडचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर : वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण

कोल्हापूर/प्रतिनिधी
पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पेालंडचे 5 हजार नागरिक निर्वासित म्हणून वळीवडेच्या ज्या भागात रहात होते, तेथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण प्रीझीदॅज यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त डाॕ मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, कर्नल विजयसिंह गायकवाड उपस्थित होते.
एक कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात येणार आहे. कँप वळीवडे येथील जीवन आणि काळ याची आताच्या आणि पुढील पिढ्यांना माहिती व्हावी हा या संग्रहालय उभे करण्यामागचा उद्देश आहे. या संग्रहालयात त्या काळातील छायाचित्रे, चित्रे आणि इतर महत्वाच्या वस्तू तसेच साहित्य ठेवले जाणार आहे. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभे राहिल.
14 सप्टेंबर रोजी सकाळी हॉटेल सयाजी येथे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांबरोबर ते परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये फौंड्री, ॲन्सीलरी मशिन कम्पोनंट्स, ऑटो पार्ट्स, हाय प्रिसीशन टूल्स, साखर आणि गुळ, यार्न स्पिनिंग मिल्स आणि टेक्सटाईल, रासायनिक आणि डेअरी उद्योगातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदही घेणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वळीवडे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे नागरिकही येणार आहेत. हे नागरिक 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर येथे राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!