तेलाची खरेदी करताना तेलाच्या लेबलवर एफएसएसएआयचा शिक्का असल्याची खात्री करावी

कोल्हापूर / प्रतिनिधी :
अन्नाशी-संबंधित समस्या हाताळणारी आणि अन्नपदार्थांसाठी शास्त्रीय-आधारित मानके निश्चित करणारी तसेच संपूर्ण पुरवठा साखळीत अन्नाच्या सुरक्षिततेची खात्री करणारी एफएसएसएआय ही सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था कठोर मानके आणि गुणवत्ता तपासण्यांचा अवलंब करणाऱ्या ब्रँड्सनाच विक्रीची परवानगी देते. मानकांचे पालन करणाऱ्या अन्न उत्पादनांना एफएसएसएआयच्या मंजुरीचा शिक्का दिला जातो. ग्राहकांनी तेलाची खरेदी करताना तेलाच्या लेबलवर एफएसएसएआयचा शिक्का असल्याची खात्री करावी. त्यामुळे तेल शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे असल्याचे सुनिश्चित होईल.
सुट्टे खोबरेल तेल वाईट बातम्यांसाठी चर्चेत असणे, सुरूच आहे. यावेळी, कोचिन ऑईल मर्चंट्स असोसिएशनने (सीओएमए) सुट्ट्या खोबरेल तेलातील भेसळीचा हा मुद्दा प्रकाशात आणला आहे. सीओएमएचे अध्यक्ष म्हणाले, “खोबरेल तेलात सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने काढलेल्या तेलाची मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे.” सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स औद्योगिक कारणासाठी तेल केक आयात करत आहेत आणि नंतर एक्स्ट्रॅक्ट केलेले तेल सुट्ट्या खोबरेल तेलात स्वस्त बनवण्यासाठी मिसळत आहेत. असे भेसळयुक्त तेल वापरासाठी योग्य आहे का? असा प्रश्न अध्यक्षांनी उपस्थित केला. अनेक वर्षे, औद्योगिक तेल सुट्ट्या खोबरेल तेलात मिसळण्याबद्दल चिंता व्यक्त होते आहे. या तेलाच्या वापरामुळे लोकांमध्ये केस गळणे आणि जळजळ होणे यापासून पक्षाघात ते कर्करोगापर्यंतचे परिणाम झालेले दिसून येतात. वास्तविक, सरकारने या चिंतांमुळेच खाद्य तेल सुट्टे विकण्यावर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी केरळ अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त खोबरेल तेल विकणाऱ्या 74 विक्रेत्यांवर बंदी घातली आणि गेल्याच आठवड्यात, अजून 14 लोकांवर बंदी घालण्यात आली.
सुट्ट्या खोबरेल तेलात भेसळ करण्याची ही पद्धत केवळ केरळ राज्यापुरतीच मर्यादित नाही. वास्तविक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ यासह 25 पेक्षा जास्त राज्यांनी सुट्ट्या खोबरेल तेलाच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि दक्ष अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या देशभरातील दोषींना शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत भेसळ केल्याच्या संशयावरून सुट्ट्या खाद्य तेलाचा 30 लाख रुपयांचा मोठा साठा मुंबईतून आणि 42 लाख रुपयांचा मोठा साठा पुण्यातून जप्त करण्यात आला.
आणि तरीसुद्धा, गेली काही वर्षे, सुट्ट्या खोबरेल तेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरूच असल्याचे अनेक अहवाल येत आहेत. स्वयंसेवी ग्राहक हक्क गट, कन्झ्युमर व्हॉईसच्या एका अहवालानुसार सुट्ट्या स्वरुपात विकले जाणारे 85% खोबरेल तेल भेसळयुक्त असते, असे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *