महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदी सौ.रिना कांबळे, सौ.हसिना फरास, शोभा कवाळे व राजसिंह शेळके यांची निवड

कोल्हापूर ता.15:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान प्रभाग समिती सभापतीपदी सौ.रिना बंडू कांबळे, छ.शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती सौ.हसिना बाबू फरास, राजारामपुरी प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके यांची निवड आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
गांधी मैदान प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.रिना बंडू कांबळे व नगरसेवक विजयसिंह पांडूरंग खाडे- पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
गांधी मैदान प्रभाग समिती सभापतीपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.रिना कांबळे यांना 11 मते तर विजयसिंह खाडे-पाटील यांना 6 मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका सौ.तेजस्विनी इंगवले, सौ.मेघा पाटील व सौ.प्रतिक्षा पाटील हया गैरहजर होत्या. सौ.रिना कांबळे यांना सर्वाधिक 11 मते पडल्याने त्यांची गांधी मैदान प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घोषित केले. नुतन प्रभाग समिती सभापती हया प्रभाग क्र.73, फुलेवाडी रिंगरोड या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
छ.शिवाजी मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.सुनंदा सुनिल मोहिते व सौ.हसीना बाबू फरास यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये सौ.सुनंदा मोहिते यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकच नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलेने नगरसेविका सौ.हसीना फरास यांची छ.शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घोषित केले. या निवडीवेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव हे गैरहजर होते. नुतन प्रभाग समिती सभापती हे प्रभाग क्र.33, महालक्ष्मी मंदीर या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत.
बागल मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेविका शोभा धनाजी कवाळे व सौ.सविता शशिकांत भालकर यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
यानंतर बागल मार्केट प्रभाग समिती सभापतीपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये शोभा कवाळे यांना 11 मते तर सौ.सविता भालकर यांना 8 मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका सौ.शमा मुल्ला हया गैरहजर होत्या. नगरसेविका शोभा कवाळे यांना सर्वाधिक 11 मते पडल्याने त्यांची बागल मार्केट प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घोषित केले. नुतन प्रभाग समिती सभापती हया प्रभाग क्र.22, विक्रमनगर या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
ताराराणी मार्केट प्रभाग सभापतीपदासाठी नगरसेवक श्रावण संभाजी फडतारे व राजसिंह भगवानराव शेळके यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
यानंतर ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतीपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये श्रावण फडतारे यांना 10 मते तर राजसिंह शेळके यांना 10 मते पडली. दोघांना समान मते पडल्यामुळे सभा अध्यक्षांनी चिठ्ठी पध्दतीने सभापती निवड करण्यात आली. यामध्ये राजसिंह शेळके यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घोषित केले. सदरची चिठ्ठी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थी कु.दिव्या संतोष कांबळे हिने काढली. नुतन प्रभाग समिती सभापती हे प्रभाग क्र.19, मुक्त सैनिक वसाहत या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
यावेळी महापौर सौ.सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसचिव दिवाकर कारंडे, विजय वणकुद्रे, सचिन जाधव, नगरसेवक/नगरसेविका यांनी नुतन प्रभाग समिती सभापतींचेे रोपे देऊन अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *