आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल: भगव्या रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करण्यास सज्ज असलेले शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शहरातून भव्य भगवी रॅलीने शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हॅट्रिकने हा गड कायम राखणार असल्याचे मत खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी केले. आमदार राजेश क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता पेटाळा मैदान येथून भव्य भगव्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या सुरवातीस छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “ठरलय नक्की, हॅट्रीक पक्की” च्या घोषणांनी रॅली परिसर दणाणून सोडला.
रॅली सुरवातीस बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी, लोकसभेला या मतदारसंघातून २७ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. शिवसेना भाजप महायुतीमुळेच लोकसभेला आपला विजय झाला आहे. गेली १० वर्षे आंदोलनात्मक, विकासात्मक, सामाजिक कामातून आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपले कर्तुत्व दाखविले आहे. आपल्या जनसेवेच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा आवाज बुलंद केला आहे. शिवसेना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, हा गड आम्ही कायम राखू. महायुतीच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले असून, येणारी सत्ताही महायुतीचीच असेल त्यात आमदार राजेश क्षीरसागर यांचे मताधिक्य सर्वात जास्त असले पाहिजे. याकरिता महायुतीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाषणाच्या सुरवातीस भाजपचे जेष्ठ पदाधिकारी कै. सुभाष वोरा यांना स्थब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या पाठबळावरच आपण आमदार बनलो असून, विविध क्षेत्रातील कामातून प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.  विरोधी उमेदवार निवडणुकीत पैशाचा वापर करेल, पण कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून कधीच पैशाला विकली जाणार नाही. शिवसेना हा कोल्हापूरचा स्वाभिमान असून, नक्कीच कोल्हापूरची जनता मला पाठबळ देईल. छत्रपती शिवरायांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून काम करीत असल्यानेच या रॅलीमध्ये अनेक समाजाचे नागरिक पाठींबा देण्यासाठी उपस्थित आहेत. टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा कामाच्या बळावरच या निवडणुकीस सामोरे जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीची भूमिका समजून सांगून पुन्हा शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आणण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी, आपण स्वत: या मतदारसंघातून इच्छुक होतो आणि गेल्यावेळी  निवडणूक लढविली आहे. शिवसेना भाजप महायुतीची गतवेळची मतांची गोळाबेरीज पाहता आमदार राजेश क्षीरसागर यांचा विजय दूर नाही. भाजपचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या बंधनाला बांधील असून, महायुतीची संपूर्ण ताकद आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी लावून त्यांना विजयी करणार असल्याचे असल्याचे सांगितले.
“घोसाळकर रिटर्न सिक्वल येणार”
चित्रपटसृष्टीमध्ये दबंग नंतर दबंग टू चित्रपट आला. सिंघम नंतर सिंघम रिटर्न आला. त्याच पद्धतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये “घोसाळकर रिटर्न” निकालानंतर पहायला मिळणार असल्याची टिप्पणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.   
ही रॅली पेटाळा मैदान मार्गे खरी कॉर्नर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या रॅलीची सांगता करणेत आली.
            या भगव्या रॅलीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोशाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले, नगरसेविका सौ. उमा इंगळे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, भाजपचे अशोक जाधव,रासप चे दशरथ भोसले, शिवसेना गटनेता नियाज खान, नगरसेवक किरण शिराळे, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, नगरसेवक राहुल चव्हाण, माजी महापौर विलासराव सासणे, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब घाटगे, रविभाऊ चौगुले, दीपक गौड, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर उदय पोवार, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, माजी नगरसेवक निशिकांत मेथे, नागेश घोरपडे, व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह समस्त शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक- कार्यकर्ते. अंगीकृत संघटना, आमदार राजेश क्षीरसागर प्रेमी आणि शहरातील तालीम संस्था आणि मंडळाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने* उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!