कोल्हापूर-सांगलीची वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून अतिरिक्त कुमक :पुणे, बारामती, सातारा व सोलापूरहून येणार 32 पथके

कोल्हापूर /प्रतिनिधी

अभुतपूर्व आलेल्या महापूराच्या संकटामुळे विस्कळीत झालेल्या यंत्रणेला युद्धपातळीवर पूर्ववत करण्यासाठी महावितरण कोल्हापूर परिमंडलाच्या मदतीला शेजारच्या जिल्ह्यांतून अतिरिक्त कुमक मिळणार आहे. पूर ओसरताच पुणे, बारामती, साताऱ्यासह बारामतीहून 32 पथके कोल्हापूर व सांगलीत दाखल होणार आहेत. याशिवाय दोन्ही जिल्ह्यातील महावितरणचे चार हजार व कंत्राटी दीड हजार असे साडेपाच हजारांचे मनुष्यबळ अवितरत कार्यरत आहे. त्यांनी दोन दिवसांत 61 हजार ग्राहकांचा व पाच उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

चार-पाच दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प असलेल्या भागात पूर ओसरताच जनजीवन पूर्ववत व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्याची तयारी महावितरणने केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कोल्हापूर व सांगलीला लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार लागणारे रोहित्र, खांब, कंट्रोल केबल, रिले, वीजमीटर आदी साहित्य कोल्हापूर व सांगलीला मिळणार आहे. यंत्रणा गतीमान करण्यासाठी प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे गुरूवारपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी शेजारच्या चार जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक मागविली आहे.

कोल्हापूरसाठी 24 व सांगलीसाठी 8 अशी 32 पथके रस्ते सुरू होताच दोन्ही जिल्ह्यात दाखल होतील. प्रत्येक पथकात एक अभियंता, 3 वीज कर्मचारी व 8 कंत्राटी कामगार असतील. आठ पथकामागे एक कार्यकारी अभियंता असेल. जो या पथकाचे पूर्ण नियोजन बघेल. तसेच पथकाकडे स्वत:चे वाहन व लागणारी साधनसाम्रुगी असेल. आवश्यक असणारे साहित्य कोल्हापूरकडे निघाले आहे.

दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय तसेच महत्वाची खाजगी रुग्णालये, रेल्वे स्थानक, बसस्थानक, पुरग्रस्तांसाठी उभारलेले कॅम्प आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 पुरग्रस्त कॅम्पला महावितरणने जनरेटरद्वारे वीजपुरवठा केला आहे. गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत 4 उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प उपकेंद्र शुक्रवारी सकाळी 11.50 वाजता पूर ओसरल्याने सुरू करण्यात आले आहे.

जसजसा महापूर ओसरत आहे. तशी वीज यंत्रणा पूर्ववत करण्यास महावितरण युद्धपातळीवर काम करीत आहे. कोल्हापूरचे कळंबा फिल्टर हाऊस गुरुवारी दुपारीच सुरु केले असून, सांगली पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठाही महावितरणकडून सुरू आहे. मात्र जॅकवेलमध्येच पाणी शिरल्याने पंपहाऊस मनपाने बंद ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!