कळंबोलीतील मलनिःसारण वाहिन्याची हायफ्लो सफाई सिडको एजन्सी नियुक्ती करणार

पनवेल(प्रतिनिधी) कळंबोली वसाहतीतील जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असताना सिडकोने आता मलनिःसारण वाहिन्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता हायफ्लो डिसिल्डींग पंपाचा वापर केला जाणार आहे. यासाठी खास एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कळंबोली वसाहतीत २५ कि.मी लांबीच्या मलनिःसारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत त्याची साफसफाई पुर्वी नियमीत होत नसल्याने अनेक ठिकाणी मलनिःसारण वाहिन्या तुंबल्या असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी सिडकोच्या जुन्या इमारतींच्या अवतीभोवती साचत आहे. बैठया घरात सांडपाणी घुसल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. जलवाहिन्याच्या खालून जाणाऱ्या या मलनिःसारण वाहिन्यांचे तुंबलेले पाणी जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमुळे शिरते त्यामुळे येथील रहिवाशांना दुषीत पाणीपुरवठा होतो. सिडकोकडे गेल्या पंचवीस वर्षापासून एकच मलनिःसारण पंप आहे. तो कालबाह्य झाला असला तरी त्याचाच वापर केला जात आहे. त्यामुळे योग्यरित्या साफसफाई होत नसल्याने ही समस्या गंभीर बनत चालली आहे. याकरीता हायफ्लो डिसिल्डींग पंपाची आवश्यकता आहे. दोन वर्षापुर्वी तत्कालीन कार्यकारी अभियंता सुनिल कापसे यांनी हा पंप आणून साफसफाई करून घेतली होती. त्यानंतर याबाबत फारशे गांभिर्याने पाहिले गेले नाही. सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, युवा कार्यकर्ते प्रशांत रणवरे,नितीन काळे, राजेंद्र बनकर, यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला होता.याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या आदेश सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधीक्षक अभियंता सिताराम रोकडे, कार्यकारी अभियंता गिरीष रघुवंशी यांनी हायफ्लो डिसिल्डींग पंपाच्या साहयाने मलनिःसारण वाहिन्या साफ करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याला मंजुरी मिळाली आहेच लवकरच निविदा प्रक्रिया पुर्ण होवून कामाला सुरूनात केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!