ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

हिरकणी महाराष्ट्राची व जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धेतून महिला बचतगट आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल

कोल्हापूर: : हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धेतून महिला बचत गटाबरोबरच उद्योग घटकांना प्रोत्साहन तर मिळेलच त्याबरोबरच विकासाचे नवे दालन उपलब्ध होईत, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज व्यक्त केला.
शासनाच्या हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा उपक्रमांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घोषणा करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा कौशल विकास व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक संचालक ज. बा. करिम, गटविकास अधिकारी सचिन घाटगे, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. मस्के आदिजण उपस्थित होते.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, देशात आज गतीमान विकास होत असून ग्रामीण भागाचाही झपाटयाने विकास होतो आहे. आज नव्याने सुरु होत असलेल्या हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा उपक्रमाव्दारे राज्यातील उद्यमशील, कल्पक आणि कर्तबगार लोकांना पुढे येण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी व विकासातील अडथळे दूर करण्यासाठी निश्चितपणे सहाय्य होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यात हे उपक्रम राबवण्यात येणार असून, निवड झालेल्या स्पर्धकांना दिल्ली येथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांची भेट व संवाद साधण्याची संधी प्राप्त होणार असल्याचेही ते म्हणाले.
हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा या उपक्रमातून बचतगटांच्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार असून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यास हे उपक्रम उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त करुन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, आज राज्यात बचतगटांची चळवळ गतीमान झाली असून महिला बचत गटांच्या माध्यमातून चूल आणि मूल यातून बाहेर पडून स्वावलंबी होत आहेत. बचतगटातील महिलांच्या कल्पनांना उद्योगाची जोड या उपक्रमामुळे मिळणार आहे.
हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा या उपक्रमाची माहिती सचिव असिमकुमार गुप्ता यांनी दिली. ते म्हणाले, या उपक्रमासाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी आरोग्य, कृषि, तंत्रज्ञान, सामाजिक परिवर्तन आणि पर्यावरण या बाबींमधील उद्योजकीय संकल्पना मांडणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक बचत गटाला 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून 10 बचतगट निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या महिला बचत गटांना त्यांच्या संकल्पनांना उद्योगामध्ये परिवर्तीत करता येईल.
जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर उद्योजकांना उत्तेजन, नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धक अर्जदाराने जिल्ह्याच्या विकासात भर घालणाऱ्या नाविन्यपूर्ण उद्योगाची संकल्पना मांडणे अपेक्षित आहे. जिल्हा नाविन्यता परिषदेच्या गरजेनुरूप संबंधित जिल्ह्यात असणाऱ्या समस्यांवर मात करणारी कल्पना मांडणे आणि या संकल्पनांवर आधारित उद्योग आराखडा सादर करणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *