उष्माघात नागरिकांनी सतर्क रहावे

कोल्हापूर,दि.4: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी उष्णाघातापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना बाळगाव्यात.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काही दक्षता घेणे आवश्यक असून तहान लागली असो किंवा नसो तरी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. हलकी, पातळ व सुती कपडे वापरावेत, घराबाहेर पडताना छत्री टोपी, गॉगल, बुट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक आहे. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. उन्हामध्ये काम करीत असलेल्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घालावी किंवा आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावेत. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादींना उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास ताबडतोब डॉक्टारांकडे जावून उपचार करावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनसेटचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे, याचा वापर करुन थंड पाण्याने वेळावेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था ठेवावी. सूर्यप्रकाशचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचना करावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेरच्या ठिकाणी काम करीत असताना अधून मधून काम थांबून कामे करावीत. गरोदर मातांची व आजारी असलेल्यांची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारणे आवश्यक आहे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे वापरु नये. तापमान जास्त प्रमाणात असल्यास शारिरीक श्रमाची कामे करण्याचे टाळावीत. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क करण्यात आलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारच्या वेळात स्वयंपाक घरात स्वयंपाक करण्याचे टाळावे. अशाप्रकारे उष्माघातात सर्व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *