गणेश मुर्ती कारागीरांना नुकसान भरपाई मिळावी: मुर्तीकारांची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराचा सर्वच घटकांना मोठा फटका बसला.तर या महाप्रलयातून कुंभार समाजातील मुर्तीकार ही सुटले नाही. महापुरामुळे कुंभार समाजातील मुर्तीकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण कुंभार समाजातील मूर्तीकारांचा आर्थिक कणाच मोडला आहे. तर काही दिवसावर गणेशोत्सव येवून ठेपल्याने गणेश मूर्ती बनविणे या कारागीरांना अशक्य बनले आहे. महापुराच्या पाण्याखाली संपूर्ण कुंभार समाज असल्याने कारागीर विविध ठिकाणी स्थलांतर झाले आहेत. त्यामुळे गणेश मुर्तीकारांनी व्यवसायासाठी काढलेले तात्पुरती कर्जे माफ करावी. तसेच कारागीरांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी शासनाने तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश मुर्ती कारागीरांना आर्थिक मदत करावी अशी मागणी हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.सदर मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर शहरातील संत गोरा कुंभार वसाहत(बापट कँप)गणेश मुर्ती बनविण्याचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे केंद्र आहे.पश्चिम महाराष्ट्रासह कोकण,गोवा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक येथील गणेश मुर्तींना मोठी मागणी असते. दरम्यान महापुरामुळे ही वसाहत पाण्याखाली गेली. वर्षभर मेहनत करून बनविलेल्या सुमारे ५५हजार ते६०हजार गणेश मुर्ती पाण्यात गेल्याने अनेक मुर्तीकारांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक अडचणींचा सामना करून सुरू असलेला हा गणेश मुर्तींचा व्यवसाय महापुरामुळे उध्दवस्त झाला आहे. जवळपास ९०टक्के कुंभार वसाहती पाण्याखाली गेल्याने सुमारे ४०हजारांहून अधिक मध्यम आकाराच्या कच्च्या मूर्ती तर रंगविलेल्या २० हजार मुर्ती जलमय झाल्या आहेत. त्यामुळे या मुर्तीकारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.वर्षभर केलेल कष्ट पाण्यात गेल असून या मुर्ती बनविण्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट अंगावर आलेली आहे. तर कौटुंबिक साहित्य ही महापुरात उध्दवस्त झाले आहे. त्यामुळे शासनाने कुंभार समाजातील गणेश मुर्तीकारांवर ओढवलेल्या संकटाचा गांभीर्याने विचार करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी गणेश मुर्तीकारांच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदणाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बाळासो चव्हाण,राज्याध्यक्ष
दिपक यादव,बबन येसरे,जयवंत सोनवले,संभाजी पोवार, मनिषा बेलवलकर, महेश सुर्यवंशी, दिंगबर पाटील, नंदकुमार बेलवलकर, अशोक माने,भाऊसो साळे,प्रशांत बांदिवडेकर, सौ.आश्विनी पाटील, पद्मावती डाफळे यांच्यासह मुर्ती कारगीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!