खर्च पथकांनी दक्षतेने कामकाज करावे – केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल

कोल्हापूर दि. 4 : 48- हातकणंगले लोकसभा मतदार संघातंर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक खर्च निरीक्षक आणि त्यांच्या अकाऊंट टीमने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिक गतीने व काळजीपूर्वक काम करून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशी सूचना 48- हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणुक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल यांनी केली. जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन समिती आणि 48- हातकणंगले लोकसभा
मतदान संघातंर्गत समाविष्ट विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक खर्च निरीक्षक आणि खर्च पथकांची विशेष बैठक केंद्रीय निवडणुक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस केंद्रीय निवडणूक निरिक्षकांचे संपर्क अधिकारी दिपक शिंदे, जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, नोडल अधिकारी श्री. बांगर, एमसीएमसीचे नोडल अधिकारी धनंजय आंधळे, सहाय्यक नोडल अधिकारी एस.आर. माने, बँकींगचे नोडल अधिकारी तथा जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक राहुल माने, जिल्हास्तरीय खर्च समितीचे सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब जाधव, संजय सरनाईक यांच्यासह सर्व संबधित समित्यांचे नोडल अधिकारी, विधानसभा मतदार संघनिहाय सहाय्यक खर्च निरिक्षकांसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च समित्यांनी परस्पर समन्वय जोपासून निवडणूक कामकाज काटेकोरपणे करावे, अशी सूचना करुन केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतही खर्च समित्यांनी अधिक दक्षता घेऊन काम करावे. उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा 70 लाखापर्यंत असून खर्च मर्यादेबाबत सहाय्यक खर्च निरीक्षकांनी सजग असावे. सहाय्यक खर्च निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तरतुदी आणि सूचनांचा अभ्यास करावा याबरोबरच आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुधारणा आणि माहितीनुसार आपआपल्या पथकाची कामगिरी चोखपणे बजावावी, अशी सूचनाही त्यांनी केली. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी होणारा दैनंदिन खर्च समितीला तात्काळ देणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या बाबींबाबत सहाय्यक खर्च निरीक्षकांनी अधिक लक्ष देऊन आपली भूमिका बजावावी, अशी सूचनाही निवडणूक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन समिती, एमसीएमसी, तक्रार निवारण व कॉल सेंटर, जिल्हास्तरीय बँक समितीस अन्य संबंधित पथकांच्या कामकाजाचा आढावा घेतला व मार्गदर्शक केले. जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांनीही यावेळी सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक आणि त्यांच्या टिमला तसेच अन्य
जिल्हास्तरीय पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांनी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी जिल्हास्तरीय खर्च समितीचे सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात खर्च समितीच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, आयकर या यंत्रणांकडून तसेच खर्च विषयक भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक यांच्यामार्फत निवडणूक काळात जप्त केल्या जाणाऱ्या रोकड, मद्य, भेटवस्तू इत्यादी
अनुषांगिक बाबी यांच्याविषयी जप्तीनंतर तात्काळ आयोगाच्या विहीत नमुन्यातील अहवाल खर्च निरीक्षकांना देण्याची सूचना केली. हा अहवाल त्याच दिवशी खर्च निरीक्षकांमार्फत निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे, त्यामुळे विधानसभा मतदारसंघ निहाय खर्च पथकांनी या बाबीची दक्षता घेणे अधिक गरजेचे
आहे. केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल यांचे कार्यालय सध्या सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9404740230 असा असून दूरध्वनी क्रमांक 0231-2665414 असा आहे. केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षक शैलेश बन्सल यांचे संपर्क अधिकारी म्हणून दिपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *