प्रभावीपणे आचारसंहिता राबवा;भंग करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा: जिल्हाधिकारी दौलतदेसाई

कोल्हापूर/प्रतिनिधी :
पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. तिचा भंग करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.या बैठकीला पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, शासकीय कार्यालय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवर असणारे राजकीय फलक, होर्डिंग्ज काढून अथवा झाकून टाकावे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी पुढाकार घ्यावा. कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या. शासकीय वाहने जमा करुन घ्यावीत. भरारी पथक, स्थायी निगरानी पथक यांची निर्मिती करुन ती कार्यरत करा. पोलीस अधिकाऱ्यांसोबत स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्र यांची तपासणी करा. राजकीय पक्ष प्रमुखांना सर्पंक साधून सभा, बैठका तसेच स्पिकर परवान्या बाबत महिती द्या. त्याचबरोबर प्रिंटींग प्रेस यांनाही मतदान साहित्य छपाईबाबत सूचना द्या. या साहित्यावर मुद्रक, प्रकाशक आणि प्रतींची संख्या छापने बंधनकारक आहे.त्यांचा छपाई परवानाही हवा. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी संयम आणि समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, कर्नाटकमध्ये निवडणूक नाही.त्यामुळे तेथून गुटखा आणि गोव्यामधून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक होण्याची शक्यता आहे. अशा सीमा भागात 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याठिकाणी सिसिटिव्हीसह नाके उभारण्यात येणार आहेत. भरारी पथकासह पोलीस पथकाने छापे घालावेत. अगदी सुरुवातीपासूनच काटेकोरपणे कारवाई करावी. प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करावी. त्यासाठी तसेच फरारी गुन्हेगारांबाबत विशेष मोहीम सुरु करावी. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीनच वाहनांना प्रवेश असेल त्याशिवाय दालनामध्ये पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल याची खबरदारी घ्यावी.
मतदारसंघ आणि निवडणूक निर्णय अधिकारी
271 चंदगड – उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विजया पांगारकर.
272 राधानगरी – उपविभागीय अधिकारी भुदरगड संपत खिलारी.
273 कागल – उपविभागीय अधिकारी राधानगरी दिप्ती सूर्यवंशी
274 कोल्हापूर दक्षिण – उपविभागीय अधिकारी करवीर वैभव नावडकर.
275 करवीर – जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे.
276 कोल्हापूर उत्तर – उपजिल्हाधिकारी महसूल श्रावण क्षिरसागर
277 शाहूवाडी – उपविभागीय अधिकारी पन्हाळा भैरप्पा माळी
278 हातकणंगले – उपजिल्हाधिकारी (रोहयो‍ ) स्मीता दामले-कुलकर्णी
279 इचलकरंजी – उपविभागीय अधिकारी विकास खरात
280 शिरोळ – जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!