डॉ सायरस पूनावाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून प्रतिष्ठेची मानद पदवी प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सायरस पूनावाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठा तर्फे प्रतिष्ठेची डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका शानदार समारंभात ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. एनसेलिया या शैक्षणिक समारंभामध्ये ऑक्सफर्ड विद्यपीठाच्या वतीने त्यांना हा सन्मान करण्यात आला. जागतिक स्तरावर लसीकरण आणि त्या माध्यमातून रोगनिर्मूलन यासाठी सातत्याने कार्य करणार्‍या आणि विविध स्तरांवर दिशादर्शक सामाजिक कार्य करणार्‍या डॉ.सायरस पूनावाला यांच्या शिरपेचात हा सम्मान म्हणजे आणखी एक मानाचा तुरा ठरला.व्हॅक्सीन च्या क्षेत्रात डॉ एडवर्ड जेंनर यांना 1813 साली या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले होते . त्यानंतर डॉ सायरस पूनावाला हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे .
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी असून याची स्थापना 1966 साली झाली. ही कंपनी विविध आजारांवरील उपाय ठरणार्‍या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी (डोसांच्या संख्येनुसार) जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. जगभरातील 30 दशलक्षाहून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील मुलांना जीवरक्षक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत .
डॉ.सायरस पूनावाला हे अतिशय दानशूर समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असून आर्थिकदृष्टया दुर्बल सामाजिक वर्गासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जीएव्हीआय या व्हॅक्सीन अलायन्स तर्फे त्यांचा नुकताच व्हॅक्सीन हिरो या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. तसेच, लसीकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल डॉ सायरस पूनावाला यांना मॅसॅच्युसेट्स विद्यापीठच्या वतीने गेल्या वर्षी डॉक्टर ऑफ ह्युमेन लेटर्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!