18 जानेवारीला प्रदर्शित होतोयं ‘कृतांत’

कोणत्याही चित्रपटाचं शीर्षक आत काय दडलंय याचं द्योतक असतं. पण काही चित्रपटांची शीर्षकं याला अपवाद ठरतात. चित्रपटाचं शीर्षक जरी कथेला समर्पक असलं तरी आत काय आहे याची चाहूल लागू न देता ते चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण करण्याचं काम करत असतात. ‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं आहे. कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत असले तरी हे गूढ 18 जानेवारीला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार तेव्हाच उलगडणार आहे.
‘रेनरोज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘कृतांत’ या चित्रपटाबाबत सुरूवातीला टीझरमुळे उत्कंठा वाढली आणि काही दिवसांपूर्वाच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने ती शिगेला पोहोचवण्याचं काम केलं. याच उत्कंठावर्धक वातावरणात ‘कृतांत’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. दत्ता मोहन भंडारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मिहीर शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून मनोरंजनासोबतच समाजाला एक सशक्त संदेश देणारा सिनेमा ते रसिक दरबारी सादर करीत आहेत. शरद मिश्रा या चित्रपटाचे सहनिर्माते असून दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.
या चित्रपटात संदिप कुलकर्णा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्याचा वेगळा गेटअप या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. हा गेटअप चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेला अनुकूल असून त्याची विचारसरणी आणि राहणीमानाला साजेसं असल्याचं मत संदिपने व्यक्त केलं आहे. या चित्रपटातील संदिपचा गेटअप पाहणा-यांच्या मनातील संभ्रम आणखी वाढवणारा आहे. हा चित्रपट नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. आजवरच्या कारकिर्दात संदिपने अशा प्रकारची व्यक्तिरेखा कधीही साकारलेली नसल्याने त्याच्या चाहत्यांनाही हा सिनेमा एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.
या चित्रपटात दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनी एक असा विषय मांडला आहे जो आजवर कधीही समोर आलेला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निसर्ग आणि मानव यातील नातं अधोरेखित करत मानवतेची एक वेगळी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संदिप कुलकणीसारख्याच सशक्त कलाकाराची गरज होती. त्यांनाही ही भूमिका आवडल्याने कथा ऐकताच होकार दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना वर्तमान काळातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजचं जीवन आणि त्या अनुषंगाने बदललेली जीवनशैली याचं चिकित्सक बुद्धीने विश्लेषण करणारा हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना काही ना काही देणारा असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे.
संदिप कुलकणीसोबत या चित्रपटात सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्याही विविध भूमिका आहेत. सुयोग गोNहे आणि सायली पाटील ही नवी कोरी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरेल. दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसणार असले तरी त्यांच्यातील ताळमेळ प्रेक्षकांना भावणारा आहे. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या चित्रपटातील गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत. मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी चित्रपटातील गीते लिहिली असून गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेलं प्रमोशनल साँग “थांब किंचित थांब…’’चे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. कॅमेरामन विजय मिश्रा यांनी अचूक छायांकन करीत ‘कृतांत’चा विषय आणि त्या ओघाने येणारं निसर्गसौंदर्य यांना उचित न्याय दिला आहे. दत्ताराम लोंढे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *