आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनात कोल्हापूर जिल्ह्याचे काम चांगले असून, जिल्ह्यात 7 जून ते 30 ऑगस्टपर्यंत जास्त पाऊस पडत असतो, त्यामुळे संभाव्य पूर बाधित ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी गावातच आपत्ती काळात मदत निर्माण व्हावी यासाठी तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था यांना प्रशिक्षण द्या व अपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करा व ग्राम पातळीवर याचे नियोजन करा. उपलब्ध असणारी आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा व यंत्रसामग्री यांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल तात्काळ द्यावा. पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच स्थितीचा अंदाज घेवून संभाव्य बाधित गावे स्थलांतरीत करण्यासाठी निवारा निश्चित करावा. अन्न धान्य सामग्री पुरेशी उपलब्ध करुन ठेवावी. आपत्तकालीन परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज रहावे व परस्परांशी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस उप अधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आपत्तीमुळे होणारी संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाचे गांभिर्याने व काटेकोरपणे नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत करावा, असे सूचित करुन आपत्कालीन काळामध्ये संबंधीत विभागप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय विनाअनुमती मुख्यालय सोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्टताही जिल्हाधिकारी यांनी दिली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, संभाव्य भूस्खलन होणाऱ्या गावांची पाहणी करुन कोणतीही आपत्ती निर्माण होण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार वाहतुक बंद पडणारे ठिकाणे निश्चित करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. वाहतूक मार्ग बंद झाल्यास ते पूर्ववत करावेत व त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवावी. आरोग्य विभागाने डेंगु, मलेरिया, गॅस्ट्रो या सारख्या आजारांचा फैलाव होवू नये यासाठी दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पाटबंधारे विभागाने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत यंत्रणांना वेळेत माहिती द्यावी. महावितरण विभागाने वाऱ्यामुळे किंवा झाडांमुळे विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्यास त्या तात्काळ हालवाव्यात व विद्युत पुरवठा सुरळीत करावा. गतवर्षी राहिलेल्या त्रुटींमधून सावध होवून यावर्षी अपत्ती काळात संपूर्ण सज्जता ठेवावी. पूर परिस्थिती उद्भवल्यास लोकांचे पर्यायी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी शाळा, मंदीरे, सभागृहे आदी ठिकाणांचे, अन्न धान्याचे, पिण्याच्या पाण्याचे तसेच अन्य आवश्यक गोष्टींचे संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी पुरविण्यात आलेले सर्व साहित्य संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून ते अद्ययावत असल्याची खात्री करुन घ्यावी. आपत्कालीन काळामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता चोवीस तास कर्तव्यदक्ष राहून सतत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या संपर्कात रहावे. कोणत्याही प्रकारची आपत्ती घडल्यास त्याची माहिती तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी. सोशल मिडियावरुन आपत्ती संदर्भात कांही मेसेज आल्यास त्याची तात्काळ दखल घेवून त्याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहचवावी व नागरिकांनी देखील सोशल मिडियावर अशा प्रकारची माहिती आल्यास ती माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी व त्याबाबत खात्री करुन घ्यावी अशा सूचना देवून जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन नियोजनाबाबत संबंधित विभागांचा सविस्तर आढावा घेतला.
महापालिकेने इंधन उपलब्धता स्थलांतरासाठीची ठिकाणे, नाले सफाई, औषधांची उपलब्धता, धोकादायक व जोखमीच्या इमारती याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत आहे. ग्रामसेवक, मेडिकल ऑफिसर व जिल्हा परिषदेचे अन्य अधिकारी, कर्मचारी आपत्ती काळात गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बैठकीस पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, महावितरण, प्रादेशिक परिवहन, परिवहन महामंडळ, वन व वन्यजीव विभाग आदि विभागांचे अधिकारी, व्हाईट आर्मी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *