कसबा बावड्यात बंद घर फोडून साडेपाच तोळे सोनं लंपास

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरातील कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये हेमंत यशवंतराव धारवाडकर यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटुन घरातील साडेपाच तोळे सोनं आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.गुरुवारी हा प्रकार घडला.सदर घटनेची तक्रार हेमंत यशवंतराव धारवाडकर(वय.४७ रा.कृष्णानंद कॉलनी,जाधव पार्क कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसा ठाण्यात दाखल केली.
कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये कृष्णानंद कॉलनीत 
हेमंत धारवाडकर हे आपल्या कुटुंबियांसमवेतत राहतात.ते मूळचे कर्नाटकातील धारवाड गावचे असून मूळ गावच्या घरामध्ये पूजा असल्याने गुरुवारी रात्री ते घराला कुलुप लावून कुटुंबियांसोबत धारवाडला गेले होते.दरम्यान याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचा कडी कोयंडा उचकुटुन आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी तिजोरी फोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख रक्कम ५०० रुपये आणि साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास केले. यामध्ये २ तोळ्याचे मंगळसूत्र, १ तोळ्याचे साधे मंगळसूत्र, कानातील १  तोळ्याचे जोड, ४ आणि ६ ग्रॅमच्या वजनाच्या कानातील रिंगा, ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र,४ ग्रॅमची अंगठी, चांदीची वाटी आणि नाणी चोरट्यानी लांबवली.शुक्रवारी दुपारी धारवाडकर घरी आल्यावर त्यांना हा चोरीचा प्रकार निदर्शनास आल्याचे, हेमंत धारवाडकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देत पाहणी केली.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ञ यांना पाचारण केले.श्वानाने फिर्यादी याच्या बंगल्याच्या मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला आणि घुटमळले.याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांढरे करत आहेत.दरम्यान सदर घटनेमुळे कसबा बावडा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!