बालकांच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी विशेष आरोग्य उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचा मानस -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर दि. 6 : जिल्ह्यातील बालकांच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी शासन योजना तसेच लोकसहभागातून आरोग्य उपक्रम हाती घेण्याचा मानस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केला.
येथील श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या नुतन इतारतीचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प.पू. आनंदनाथ महाराज सांगवडेकर, वैद्य समीर जगदमणे आदि मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरातील झोपडपट्टीतील कुपोषित मुलांसाठी लोकसहभागातून आरोग्य उपक्रम हाती घेतला असून या मुलांचे हेल्थ कार्ड तयार करून त्यानुसार उपचार व आहार पध्दती अवलंबिली जात आहे. याच धर्तीवर श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या मोदामृताच्या यशस्वीतेनंतर यापुढील काळात झोपडपट्टीतील किमान 500 मुलांसाठी आरोग्य उपक्रम हाती घेतला जाईल. भविष्यात जिल्ह्यातील 1 लाख मुलांसाठी हा उपक्रम श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या सहकार्याने राबविण्याचा मानसही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
समाजातील सर्व घटकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ असावे, यासाठी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राची मोलाची मदत होईल. या केंद्राव्दारे भविष्यात जनतेच्या आरोग्यासाठी नवनवीन आयुर्वेदिक उपचार पध्दती विकसित करून त्याचा लाभ लोकांना मिळवून द्यावा. लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी यादृष्टिनेही समाजात आपुलकी,आदरभाव,परंपरा या सर्व गोष्टींकडे सकारात्मक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार सतेज पाटील,आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प.पू. आनंदनाथ महाराज सांगवडेकर, वैद्य समीर जगदमणे,वैद्य प्रसाद पानकर, कैलास काटकर आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी वैद्य राहुल शेलार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प.पू. आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. मंत्रीमहोदयांनी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.
समारंभास क्विकहिलचे कैलास काटकर,माणिक पाटील चुयेकर,नगरसेवक किरण नकाते, माजी नगरसेविका माधुरी नकाते, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव,विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे पदाधिकारी, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राचे डॉक्टर व अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!