चंद्रकांतदादांच्या प्रयत्नातूनच रिक्षा चालक संघटनेचा विकास : बाबा इंदुलकर

कोल्हापूर /प्रतिनिधी
आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा रिक्षा संघटना अध्यक्ष विजय गायकवाड व भाजपा उपाध्यक्ष बाबा इंदुलकर यांच्या पुढाकाराने रिक्षा चालक संघटनेचा मेळावा आयर्विन ख्रिश्चन हॉल येथे मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक विजय गायकवाड यांनी केले. तसेच नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली.
या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष बाबा इंदूलकर म्हणाले, रिक्षा चालक म्हणजे शहराचा चालता-बोलता CCTV आहे. सर्वप्रथम आपल्या व्यवसाय सांभाळून याठिकाणी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल सर्व रिक्षा बांधवांचे अभिनंदन केले. आज कोल्हापूर मध्ये २० हजार पेक्षा जास्त प्रवासी व मालवाहतूक करणारे रिक्षा व्यवसायीक आहेत. हा रिक्षा व्यवसाय असंघटीत स्वरूपामध्ये असल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेली कुटुंबे अतिशय गरीबीत जीवन जगतात. कॉंग्रेसच्या ३० वर्षाच्या काळापेक्षा जास्त काम गेल्या ५ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रिक्षा व्यवसायिकांच्यासाठी झाले आहे. रिक्षा चालकाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी दादांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरु आहेत. नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नावर सविस्तर चर्चा केल्यानंतर या रिक्षा व्यवसायीकांसाठी पंडित दिनद्याल उपाध्याय सहकारी सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. सोसायटीच्या कामाच्या माध्यमातून भविष्यामध्ये रिक्षा व्यवसायाला लागणाऱ्या मुलभूत गरजा म्हणजे टायर्स, स्पेअर पार्ट, ऑईल, इन्शुरन्स इत्यादी गोष्टी बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व महायुतीचे उमेदवार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई म्हणाले, या कोल्हापुरात अनेक रिक्षा व्यवसायीक अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु ठेवला आहे. आताच्या युगात घरोघरी २ व्हीलरची संख्या वाढल्यामुळे तसेच प्रवासी वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही न डगमगता हा रिक्षा पुढे नेण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी भविष्यातही या व्यवसायीकांच्या पाठीशी ठामपणे राहील.
प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदीमय वातावरण तयार झाले आहे. अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून यशस्वीरीत्या या सर्व योजना तेंच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे. सकाळी सात वाजलेपासून रात्री नऊ पर्यंत हे रिक्षा व्यवसायिक कोल्हापूरच्या प्रवाशांना घेऊन कोल्हापूरच्या काना-कोपऱ्यात फिरत असतात. त्यामुळे त्यांनी यासर्व लोकांशी संपर्क करून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी कसे योग्य आहेत हे संवादाच्या माध्यमातून समजावून सांगावे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार आहे त्यामुळे येत्या २३ तारखेला महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना लोकसभेत पाठवून मा.नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करुया असे आवाहन केले. याप्रसंगी विजय जाधव, राहुल चिकोडे या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, हितेंद्र पटेल, नजीर देसाई, नचिकेत भुर्के, आर.डी.पाटील, संजय केसरकर, उदय गायकवाड, अतुल माळकर, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, गणेश जाधव, तौफिक बागवान आदींसह पदाधिकारी व रिक्षा व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *