तृणधान्याचे प्रक्रिया पदार्थ काळाची गरज – कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 16, (सांगली) : ज्वारी, बाजरी, नाचणी या तृणधान्यामध्ये पौष्टीक घटक आहेत. या तृणधान्याचे प्रक्रिया पदार्थ बनविल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल व या तृणधान्याचे क्षेत्रही वाढेल, असे प्रतिपादन कृषि, फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

केंद्र शासनाने सन 2018-19 हे पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्याअनुषंगाने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबाबत जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग, आत्मा व जिल्हा परिषद कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, माजी अतिरीक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप सातपुते, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी आदि उपस्थित होते.यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्यास चांगले व शाश्वत भाव मिळतील. तसेच, मानवी शरीराला पौष्टिक आहाराची गरज आहे. यामध्ये तृणधान्ये मोलाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील म्हणाले, सध्याची पिढी फास्ट फुडकडे वळत आहे. पूर्वीचे लोक पौष्टिक पदार्थांचे सेवन करत असल्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून दीर्घआयुष्य त्यांना लाभत होते. याचा प्रत्येकाने विचार करावा, असे ते म्हणाले.

माजी अतिरीक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी आहार व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तृणधान्यांचे जीवनातील महत्व विषद केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप सातपुते यानीही सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिकेवर वितरीत करण्यात येत असलेल्या अन्नधान्याची सविस्तर माहिती दिली.प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याबाबत सविस्तर माहिती दिली. आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, शेतकरी, शेतकरी गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *