राजारामपुरीतील सेंट मेरी स्कूलला युवासेनेचा दणका: युवा सेनेच्या आंदोलानानंतर अन्यायग्रस्त विद्यार्थिनीला दिला पुन्हा शाळेत प्रवेश

कोल्हापूर /प्रतिनिधी
गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरातील शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत गेल्याच आठवड्यात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. याची आढावा बैठक कालच गर्ल्स हायस्कूल शिवाजी पेठ येथे पार पडली. परंतु याची कोणतीही तमा न बाळगता राजारामपुरी येथील सेंट मेरी स्कूलने त्याच शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आणि नुकतीच ९ वीची परीक्षा पास होऊन १० वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीला १० वीमध्ये प्रवेश देण्यास नकार देत चक्क तिचा शाळा सोडलेचा दाखला पोस्टाने घरी पाठविण्याचा प्रताप केला. सदर विद्यार्थिनीच्या पालकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे विद्यार्थिनीवर होत असलेल्या अन्यायाची, मानसिक व शारीरिक छळाची लेखी तक्रार केली. त्यानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचे शिष्टमंडळ सदर शाळेमध्ये चर्चेकरिता गेले असता युवा सेनेच्या पदाधिकार्यांना दमदाटी करण्याची भाषा संस्था चालकांनी दाखविली. यावर युवा सेनेने जशास तसे उत्तर देत कायदेशीर मार्गाने पोलीस ठाण्यात जावून संबधित संस्था चालकांवर बाल संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकार्यांचा रुद्रावतार पाहून संस्थाचालकांनी आपली चूक कबूल करून सदर विद्यार्थिनीस पुन्हा शाळेत प्रवेश देत असल्याचे पोलीस प्रशासनास सांगितले. युवा सेनेच्या या दणक्याने अन्यायग्रस्त विद्यार्थिनीला पुन्हा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जवाहरनगर येथे राहणाऱ्या रीना भोसले यांची मुलगी कुमारी शिवानी भोसले हि राजारामपुरी येथील शासकीय अनुदान प्राप्त असणार्या सेंट मेरी स्कूलमध्ये गेल्या ७ वर्षांपासून शिक्षण घेत आहे. शिवानी हि अभ्यासात अत्यंत हुशार व होतकरू स्वरुपाची असून, पालकांनी डोनेशन देण्यास विरोध केल्याने गेले वर्षभर सदर विद्यार्थिनीस शाळेचे संचालक बाबला उस्ताद व करीमा उस्ताद यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास, मारहाण, शैक्षणिक अडथळा अशा पद्धतीची वागणूक देण्यात येत होती. याबाबत श्रीमती रीना भोसले यांनी एप्रिल महिन्यात आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधून शाळेवर कडक कारवाई करून विद्यार्थिनीस न्याय मिळवून देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी शाळेच्या संचालकांना प्रत्यक्ष बोलवून विद्यार्थिनीस प्रवेश देण्याबाबत समज दिली होती. त्यानंतर सदर विद्यार्थिनीस प्रवेश देण्याचे संचालकांनी मान्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *